You are here

मुंबईला लाभला पहिला ‘सेफ स्कूल झोन’

तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर देशभरातील शाळा सुरू होत असताना मुंबई वाहतूक पोलीस, डब्ल्यूआरआय इंडियाच्या तंत्रज्ञान सहाय्य चमूसह बृहन्मुंबई महानगरपालिका, स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञ यांच्यातर्फे मुंबईतील रस्ते सुरक्षित, चैतन्यमय, चालण्याजोगे आणि बालकस्नेही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२१: बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), इंडिया रॉस सेंटर यांच्या भागीदारीने भायखळा येथील मिर्झा गालिब मार्गावर शहरातील पहिला सेफ स्कूल झोन तत्वावर सुरू केला.

या प्रकल्प ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी यांच्यातर्फे हाती घेण्यात आला आहे. मुंबईत बालक-स्नेही आणि चालण्याजोगे स्कूल झोन तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. रस्ता वापरकर्त्यांसाठी, विशेषतः मुलांसाठी रस्ते चालण्याजोगे, विनाअडथळा, सुरक्षित आणि अधिक चैतन्यमय करणारी डिझाइन सोल्यूशन्स या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पात राबविण्यात येणार आहेत.

बुधवारी, मुंबई वाहतूक पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी रंग, बॅरिकेड्स आणि कोन्सचा प्रायोगिक तत्वावर वापर केला. डिझाइन सोल्यूशनमध्ये माहितीफलकांचा वापर करून स्कूल झोन्सची आखणी करणे, रस्त्यांवर खुणा करणे, चालण्यासाठी व वाट पाहण्यासाठी निश्चित भाग नियुक्त करणे, पिक-अप झोन, ड्रॉप झोन यासह मल्टि-युटिलिटी (बहु-उपयुक्तता) झोन्स निश्चित करणे, खेळण्यासाठी बालकस्नेही घटकांचा अंतर्भाव करणे आणि पादचाऱ्यांसाठी ठळक क्रॉसिंग आखणे याचा समावेश आहे. कमी खर्चाच्या साहित्याचा वापर करून केलेल्या या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाविषयी या परिसरातील नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यात येतील आणि त्यानंतरच हे बदल कायमस्वरुपी करण्यात येतील.

समाजवादी पक्षाचे स्थानिक नगरसेवक रइस शेख म्हणाले, “विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि शाळेतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच, शाळेत जाण्याचा मार्गही सुरक्षित असावा, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबईत शाळा चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी हे रस्ते चालण्याच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने अनेक पालक त्यांच्या वाहनांनी मुलांना शाळेत पोहोचवतात. मुलांसाठी रस्ते सुरक्षित केल्याने रस्ते वापरणाऱ्या सर्वांसाठीच ते सुरक्षित कसे होतील, हे या प्रयोगातून दिसून येईल.”

ई वॉर्डमधील (भायखळा) मिर्झा गालिब मार्गावर ख्राइस्ट चर्च स्कूल आणि सेंट अॅग्नेस हाय स्कूल या दोन शाळा आहेत. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांच्या काळात ख्राइस्ट चर्चच्या परिसरातील ५०० मीटरच्या परीघात २३ अपघात झाले आणि ३ मृत्यू झाले. यात दोन मुलांचाही समावेश होता. घरी परत जाताना झालेल्या अपघातात त्यांना गंभीर इजा झाली होती आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच, २०१७ ते २०१९ या काळात मुंबईतील एकूण २,६१० शाळांपैकी २८% शाळांच्या ५०० मीटरच्या परिघामध्ये तीनहून अधिक अपघाती मृत्यू झाले आहेत.

पोलीस उपायुक्त (वाहतूक) योगेश कुमार म्हणाले, “पादचाऱ्यांसाठी रस्ते सुरक्षित करण्यावर इथे भर देण्यात आला आहे आणि असे केल्याने एकूणच रस्ते कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होईल, अशी आमची अपेक्षा आहे. या प्रयोगानंतर मुंबईभर हा प्रकल्प राबविण्यासाठी एक निश्चित मार्ग मिळेल.”

ई वॉर्डचे सहाय्यक आयुक्त मनीष आर. वाळुंज म्हणाले, “आम्ही या प्रायोगिक तत्वावर राबविलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करू, वाहतूक पोलीस, शाळा व्यवस्थापन, स्थानिक समुदाय अशा सर्व भागाधारकांकडून प्रतिक्रिया घेऊ आणि कायमस्वरुपी अंमलबजावणीसाठी योजना तयार करू.

ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीजच्या केली लार्सन म्हणाल्या, “शहरातील रहिवाशांची रहदारी आणि सुरक्षितता वाढविण्यात रस्त्यांची रचना कारसाठी न करता लोकांसाठी करण्याची महत्त्वाची भूमिका असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेशी भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. कारण सर्वात असुरक्षित रस्तेवापरकर्त्यांसाठी म्हणजे मुलांसाठी सुरक्षित रस्ते व सुरक्षित रहदारीसाठी ते आपल्या प्रयत्नांची व्याप्ती वाढवत आहेत. सेफ स्कूल झोन उपक्रमामुळे अनेक जीव वाचतील आणि भारतातील इतर शहरांसाठी हे एक पथदर्शक प्रारुप असेल.”

ख्राइस्ट चर्चच्या परिसरात या शाळेतील विद्यार्थ्यांना काय पाहायला आवडेल हे जाणून घेण्यासाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये डब्ल्यूआरआय इंडियाने या शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत एक कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये, त्यांना काय आवडते/आवडत नाही हे जाणून घेण्यासाठी शाळेच्या परीसरात फेरी आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यात एक व्हिज्युअलायझेशनचा प्रयोगही समाविष्ट होता. या अंतर्गत मुलांना रस्त्यावर त्यांना आवडणारे घटक समाविष्ट करायचे होते. त्याचप्रमाणे प्रवासाचे कशा प्रकारे केला जातो, मुलांचा प्रवासात जाणारा वेळ आणि त्यांच्यासमोरील आव्हाने जाणून घेण्यासाठी डब्ल्यूआरआय इंडियाने भागधारकांशी सल्लामसत केली होती आणि सर्वेक्षण केले होते.

डब्ल्यूआरआय इंडियाच्या सस्टेनेबल सिटीज आणि ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक रोहित टाक म्हणाले, “जवळपास ५७% पालकांना आम्हाला सांगितले की, त्यांच्या मुलांच्या शाळेच्या परिसरातील रस्ते मुलांच्या दृष्टीने सुरक्षित नाहीत. यासाठी चांगल्या दर्जाचे पदपथ नसणे आणि वाहनांची गर्दी असणे हे घटक कारणीभूत आहेत.” ते पुढे म्हणाले, “मुलांची उंची, आकलनक्षमता आणि धोका ओळखण्याची क्षमता ही प्रौढांच्या तुलनेने कमी असल्यामुळे मुलांना जास्त धोका असतो. या आमच्या योजनेमध्ये बालकस्नेही, सुरक्षित रस्ता असेल जो त्यांचा शाळेत येण्या-जाण्याचा प्रवास आरामदायी व आनंददायी करेल.”

Stay Connected

Sign up for our newsletters

Get the latest commentary, upcoming events, publications, and multimedia resources. Sign up for the monthly WRI India Digest.